Bourbon Whiskey : जगभरात एआयमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचे वारे वाहत आहे. आता मद्य क्षेत्रातही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. बॉर्बन व्हिस्की जगतात जगप्रसिद्ध असलेल्या 'जिम बीम' या ब्रँडने आपल्या अमेरिकेतील केंटकी येथील मुख्य कारखान्यातील उत्पादन वर्षभरासाठी थांबवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. 'सनटोरी ग्लोबल स्पिरिट्स'च्या मालकीच्या या कंपनीने २०२६ या संपूर्ण वर्षासाठी उत्पादन बंद ठेवण्याची घोषणा केली असून, यामुळे जागतिक मद्य बाजारपेठेत खळबळ माजली आहे. वाढता साठा आणि जागतिक व्यापारातील अनिश्चितता हे या निर्णयामागील मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.
उत्पादन बंद करण्यामागील 'गणित' काय?
कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंटकी येथील डिस्टिलरी २०२६ मध्ये पूर्णपणे बंद राहील. सध्या केंटकीमधील गोदामांमध्ये तब्बल १.६ कोटी बॅरल व्हिस्कीचा विक्रम साठा पडून आहे. या अफाट साठ्यामुळे कंपन्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. या साठ्यावर राज्य सरकारकडून दरवर्षी 'स्टॉक टॅक्स' लावला जातो, ज्यामुळे यावर्षी मद्य उत्पादकांना सुमारे ७.५ कोटी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ६,२०० कोटी रुपयांचा प्रचंड तोटा सहन करावा लागला आहे. या काळात कंपनी कारखान्याच्या आधुनिकीकरणासाठी मोठी गुंतवणूक करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
ट्रम्प यांचे धोरण आणि कॅनडाचा 'बहिष्कार'
जिम बीमच्या या संकटामागे जागतिक भू-राजकीय स्थितीचाही मोठा वाटा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या नवीन व्यापार शुल्कामुळे मद्य निर्यात महागली असून उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. तसेच, २०२५ च्या सुरुवातीपासूनच शेजारील कॅनडातील अनेक प्रांतांनी अमेरिकन मद्यावर बहिष्कार टाकला आहे. या व्यापार तणावाचा थेट फटका जिम बीमच्या विक्रीला बसला असून मागणी घटल्याने उत्पादन थांबवणे अपरिहार्य झाले आहे.
वाचा - घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
१,००० कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचे काय?
केंटकीमध्ये कंपनीचे १,००० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. उत्पादन बंद असताना या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांचे काय होणार, यावर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. मात्र, या कालावधीत कर्मचाऱ्यांचे समायोजन कसे करायचे, यावर 'श्रमिक संघा'सोबत चर्चा सुरू असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मद्यप्रेमींसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे, या काळात कंपनीचे 'विजिटर सेंटर' मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
